पुणे: शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नादात तिघांना फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पहिल्या घटनेमध्ये वाघोली भागात राहणाऱ्या संदीप केशव सपकाळ (वय- ४३) यांनी शनिवारी (दि. २३) लोणीकंद पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २० डिसेंबर ते १२ फेब्रुवारी २०२४ यादरम्यान घडली आहे. फिर्यादी यांना स्टॉक एक्स्चेंजचे लाईव्ह सेशन घेण्यात येणार असल्याबाबत सोशल मीडियावर ऍडव्हर्टाइज दिसली. त्यावर क्लिक केल्यानंतर ते एका ग्रुपमध्ये ॲड झाले. त्यामध्ये दररोज शेअर मार्केटविषयी माहिती दिली जात होती. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो असे भासवले जात होते. गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांना ट्रेडिंग करण्यासाठी एक ॲप डाऊनलोड करायला लावले. यात फिर्यादी यांनी तब्बल ४५ लाख ३० हजार रुपयांची गुंतवणूक केली. पैसे मिळणार नाहीत, याची खात्री झाल्यावर लोणीकंद पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या घटनेत, नचिकेत महादेव राऊत (वय- ३) यांनी रविवारी (दि. २४) चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १४ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२४ या दरम्यानच्या काळात शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून त्यांना तब्बल ३३ लाख ९९ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, कोणताही नफा न देता त्यांची फसवणूक केली आहे.
तिसऱ्या घटनेत औंध परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर पंडितराव काकडे (वय- ४२) यांनी शनिवारी (दि. २३) दिलेल्या फिर्यादीनुसार, शेअर ट्रेडिंगमध्ये आयपीओ मिळवून देण्याचे आमिष दाखवून २३ लाख ४६ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, परतावा न देता फसवणूक केल्याचे लक्षात येताच चतुःशृंगी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.