पिंपरी : कोरोनाच्या महामारीत एकीकडे माणुसकीचे दर्शन घडविणारे अनेक प्रसंग समोर येत असतानाच मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. रुग्णवाहिकेतून जात असलेल्या एका नागरिकाची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांचा जीव वाचविण्यासाठी त्यांच्या मुलाने जीवाचा आटापीटा केला. मात्र वेळीच उपचार मिळू न शकल्याने त्या नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) दुपारी घडली असून, याबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नरेश रामदास शिंदे, असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नरेश शिंदे आणि त्यांचा मुलगा नीलेश शिंदे यांची रुग्णवाहिका आहे. ते दोघे शुक्रवारी (दि. 27) ठाणे येथून रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना घेऊन चाकणमार्गे अहमदनगरकडे जात होते. त्यावेळी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से येथील टोलनाक्यावर पोलिसांनी त्यांच्या वाहनाची तपासणी केली. त्यानंतर त्यांची रुग्णवाहिका तळेगाव-शिक्रापूर रस्त्याने चाकणच्या दिशेने जात असताना नरेश शिंदे अत्यवस्थ झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे मुलगा नीलेश यांनी त्यांच्या छातीवर चोळून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यालगतच्या काही रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच उपचार मिळू न शकल्याने नरेश शिंदे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शवविच्छेदनासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले.
दरम्यान नीलेश शिंदे यांनी याबाबत पोलिसांवर आरोप केले आहेत. पोलिसांनी उर्से टोलनाक्याजवळ आमची रुग्णवाहिका थांबवून आम्हाला दमदाटी केली. तसेच आमच्या रुग्णवाहिकेत रुग्ण नसून आम्ही प्रवासी वाहतूक करीत असल्याचे म्हणून आमच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच वडील नरेश शिंदे यांना काठीने पायावर मारून आमच्याकडून तीन हजार रुपये घेतले. याप्रकारामुळे प्रचंड घाबरून वडील अत्यवस्थ झाले.
अकस्मात मृत्यूची नोंदयाप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येत आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या शिरगाव पोलीस चौकीकडे ती नोंद वर्ग करण्यात येईल, अशी माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.
पोलिसांच्या चौकशीचे आदेशकारोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी आहे. त्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करण्यात आली असून, प्रत्येक वाहनाची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. त्याप्रमाणे संबंधित रुग्णवाहिकेची देखील पोलिसांनी तपासणी केली असावी. याप्रकरणी चौकशी करण्याचे सहायक पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. तसेच शवविच्छेदन अहवालातूनही संबंधित व्यक्तीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले.