पुणे : एकीकडे कोरोनामुळे जनमानसात भीतीचे वातावरण असतानाच दुसरीकडे मात्र प्रशासकीय असंवेदनशीलतेचे दर्शन घडत आहे. केवळ १०८ रुग्णवाहिका चालकांनी येण्यास नकार दिल्याने तीन तास वेदनेने तळमळत असलेल्या ५७ वर्षीय व्यक्तीला प्राण गमवावे लागल्याची घटना नाना पेठेत शुक्रवारी पहाटे घडली. शेवटी त्यांचा मृतदेह भाजीच्या टेम्पोमधून ससूनपर्यंत वाहून नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली. या घटनेमुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.येशूदास मोती फ्रान्सिस (वय ५७, रा. मनुशाह मस्जिदजवळ, नाना पेठ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सिस यांना पोटाचा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. शुक्रवारी मध्यरात्री बारा-साडेबाराच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना घराबाहेर आणून खुर्चीवर बसविण्यात आले. दरम्यान, १०८ रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला. परंतु, त्यांनी येण्यास नकार दिला. त्यानंतर, पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनीही १०८ ला फोन केला. परंतु, कोणीही यायला तयार नव्हते. आजारी असलेली व्यक्ती जिवंत आहे की मृत आहे याचा चौकशीत पहाटे तीनपर्यंतचा वेळ घालवण्यात आला. या काळात वेदनेने तळमळत असलेले खुर्चीतच फ्रान्सिस निपचित पडले होते. रस्त्यावर लावलेले पत्रे कार्यकर्त्यांनी बाजूला केले. रस्त्यावरून मार्केट यार्ड येथे भाजी भरण्यास जात असलेल्या एका टेम्पो चालकाला विनंती करून फ्रान्सिस यांना हौद्यात टाकून ससून रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासणीपूर्वीच मृत घोषित केले.