पुणे : अंत्यविधीच्या सुरु असताना चितेवर रॉकेल टाकताना भडका उडल्याने कैलास स्मशानभूमीतील दुर्घटनेत ११ जण जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना एकाचा मृत्यु झाला. याप्रकरणी आगीचा भडका उडवून लोकांना जखमी करण्यास जबाबदार असलेल्या एकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
गणेश सर्जेराव रणसिंग (वय ४९, रा. दत्तविहार, आव्हाळवाडी, वडजाई, वाघोली) अशी अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत रॉकेलच कॅन ज्याच्या ताब्यात होता ते अनिल बसन्ना शिंदे (वय ५३, रा. ताडीवाला रोड) यांचे उपचार सुरु असताना निधन झाले आहे. ही घटना कैलास स्मशानभूमीत ३० एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसात वाजता घडली होती.
याबाबत प्रतिक दीपक कांबळे (वय २४, रा. महात्मा फुले वसाहत, ताडीवाला रोड) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे., दीपक कांबळे यांच्यावर वडिलांवर कैलास स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत होते. चितेस अग्नि देण्यात आला होता. त्यापासून काही अंतरावर महिला व पुरुष बसले होते. गणेश रणसिंग याने अनिल शिंदे याच्याकडील रॉकेलचा कॅन घेतला व कॅनमधील रॉकेल अग्नी दिलेल्या चितेवर ओतू लागला. तेव्हा भडका उडाल्याने त्याच्या हातातील कॅन पेटला. त्यामुळे त्याने पेटलेला कॅन जोरात फेकला. तो बाजूला बसलेल्या नातेवाईकांच्या अंगावर पडून त्यात ११ जण भाजले.
या सर्वांवर ससून व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. उपचार सुरु असताना अनिल शिंदे यांचा २ मे राेजी मृत्यु झाला. आणखी दोघा जणांची प्रकृती गंभीर आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव तपास करीत आहेत.