धायरी (पुणे) : अवजड डंपरच्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. सिंहगड रस्ता परिसरातील नांदोशी येथे हा अपघात घडला असून याबाबत हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत आहे. संजय राजाराम बाबर (वय: ५० वर्षे, रा. जावळी जिल्हा सातारा) असे त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक मल्लिकार्जुन नीळकंठराव बिराजदार (वय : ३९ वर्षे, रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता, मूळगाव : गुलबर्गा) याला ताब्यात घेतले असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी 'लोकमत'ला दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संजय बाबर हे नांदोशी येथील मनन आश्रमजवळ असणाऱ्या एका विहिरीचे काम करण्यासाठी आले होते. दरम्यान ते नांदोशी येथील मुख्य रस्त्यावरून चालत जात असताना बाजूने चाललेल्या डंपरने अचानकपणे डाव्या बाजूला आपले वाहन घेतले. मात्र डाव्या बाजूला चालत जाणारे संजय बाबर हे चालकाला दिसले नसल्याने त्यांना डंपरची जोराची धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे डंपरचालक व इतर डंपरचालकांनी त्यांना खाली उतरुन पाहिले. तसेच त्यांना वाहनाखालून ओढून काढून बाजूला टाकले व सर्व डंपर तेथून मार्गस्थ झाले.
अवजड वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन...
स्थानिक महसूल खात्याच्या आशीर्वादाने नांदोशी परिसरात क्रशर, दगडाच्या खाणी, चालविल्या जात असताना पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. खाण व क्रशरधारक राजरोजपणे बेकायदेशररित्या नियमांना बगल देत अक्षरशः डोंगरांची चाळण करत आहेत यातून नियमापेक्षा जास्त उत्खनन करून शासनाच्या रॉयल्टीला चुना लावत आहेत. सर्व क्रशरधारक खाण धारक उत्खनन या व्यवसायातून लाखो रुपयाचा मलिदा खाण्याचे काम सुरू असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. त्याचबरोबर अवजड वाहनांना सकाळी साडेआठ ते अकरा व सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत परिसरात वाहतुकीस बंदी असताना देखील नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे वाहतूक सुरू आहे.