पुणे : पुणे शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज छाननीच्या दिवशी पुण्यातून एक अर्ज बाद झाला तर शिरूरमधून ११ अर्ज बाद झाले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून चार अर्ज रिंगणातून बाहेर पडले आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४२ उमेदवारांनी ५८ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी केवळ एक अर्ज अवैध ठरला आहे. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी मोनिका मोहोळ यांनी सूचक म्हणून अर्ज भरला होता. त्यांना पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला आहे. मात्र मोनिका मोहोळ यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज वैध ठरला असून पुण्यात ४२ उमेदवारांचे एकूण ५७ अर्ज वैध ठरले आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघात ४६ उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ५८ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत अकरा उमेदवारांचे अकरा अर्ज बाद झाले आहेत. तर मावळ लोकसभा मतदारसंघातून ५० अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ४ अर्ज बाद ठरले आहेत.