लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचे कारनामे सायबर पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. त्या टोळीतील एकाला पारनेर (जि. अहमदनगर) येथून सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
विशाल मीनानाथ जमदाडे (वय २४) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार अनुप ढोरमले (रा. जातेगाव, ता. पारनेर) हा सध्या गुजरात राज्यातील बडोदा कारागृहात आहे. ढोरमले हा टोळीचा मुख्य सूत्रधार असून, त्याच्यावर गुजरातसह महाराष्ट्रात गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने जमदाडेला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात २०२० मध्ये नोकरीच्या आमिषाने ४ लाख ६० हजारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी, आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना, ही फसवणूक अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दोघांनी केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी पारनेर शहरात सापळा रचून जमदाडेला ताब्यात घेतले. जमदाडे हा ढोरमलेला पैसे स्वीकारून काढून देत होता. विविध संकेतस्थळांवर नोकरी मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींची माहिती आरोपी मिळवत होते. त्यानंतर त्यांच्यासोबत संपर्क करून विदेशातील नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत बनावट डोमेनवरून त्यांना मेल पाठवत होते. मेलला प्रतिसाद मिळाल्यानंतर वैद्यकीय चाचणी, व्हिजा, मुलाखत अशा विविध बहाण्याने आर्थिक लूट करत होते. या टोळीतील अन्य साथीदारांचा शोध सुरू असून, अशाप्रकारे किती जणांची आरोपींनी फसवणूक केली आहे याचा तपास पोलिस करत आहेत.
पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत, अंकुश चिंतामन, कर्मचारी संदेश कर्णे, अस्लम अत्तार, मंगेश नेवसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.