पुणे/किरण शिंदे : पाच मित्र, जिगरी यार... एकाच परिसरात राहणारे.. एकत्रच वाढले.. वयाच्या विशिनंतरही मैत्री टिकून राहिली, वाढतच गेली.. पंचक्रोशीत चर्चा त्यांच्या मैत्रीची.. मात्र 10 डिसेंबर रोजी अशी काही घटना घडली की या मैत्रीच्या नात्याला तडा गेला. त्यादिवशी हे पाचही मित्र पार्टी करण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र संध्याकाळी त्यातला एक परत आलाच नाही. काय घडलं त्याच्यासोबत? मित्र कसे नसावेत हे सांगणारी ही पुण्यातील घटना आहे.
गणेश, रोहन, अक्षय, चेतन, योगेश हे पाचही मित्र पुण्याच्या हडपसर परिसरातील सातववाडी गावात राहणारे आहेत. रविवारी म्हणजेच 11 डिसेंबर या दिवशी पार्टी करण्यासाठी म्हणून हे सर्वजण घरातून बाहेर पडले. यातील चार जण त्याच रात्री घरी परतले. मात्र गणेश मुळे हा काही घरी आलाच नाही. त्याच्या वडिलांनी एक दिवस वाट पाहिली आणि दुसऱ्या दिवशी हडपसर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तक्रार येताच पोलिसांनी गणेश मुळे याच्या विषयी माहिती काढण्यास सुरुवात केली. शेवटच्या क्षणी तो कोणासोबत होता याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. आणि समोर आलं धक्कादायक सत्य.
जेवणासाठी एकत्र घराबाहेर पडलेल्या या मित्रांपैकी एकाजवळ देशी बनावटीचे पिस्तूल होत. उत्सुकतेने पिस्तूल पाहत असताना त्यातून चुकून उडालेली गोळी गणेश मुळेच्या छातीत लागली. आणि गणेश रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. बरोबर छातीत गोळी लागल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र इतरांनी जे केलं ते भयंकर होतं. ही घटना लपवण्यासाठी त्यांनी गणेशचा मृतदेह एका चादरीत गुंडाळला. आणि मध्यरात्री दोन नंतर बोपदेव घाटात एका झुडपात फेकून दिला. त्यानंतर हे सर्व मित्र काही घडलंच नाही अशा अविर्भावात वावरत होते. मात्र पोलिसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या सांगण्यानुसार बंदुकीतून चुकून सुटलेली गोळी गणेश मुळेला लागली आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना मात्र वेगळाच संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.