पुणे - मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी अपंग बांधवांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे म्हणत जक्क जामरवरच हातोडा घातला आहे. गेल्या 6 दिवसांपासून महापालिकेच्या ताब्यात असलेल्या गाडीला बंधनमुक्त करुन त्यांनी दिव्यांग व्यक्तीची गाडी त्यास अशा पद्धतीने परत मिळवून दिली. यापूर्वीही महापालिकेच्या अधिकाऱ्याची गाडी फोडल्यामुळे वसंत मोरे चर्चेत आले होते. त्यानंतर, आता पुन्हा एकदा वसंत मोरेंचा जॅमर फोडल्याचा एक घाव दोन तुकडे केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
महापालिकेनं एका गरीब अपंग दाम्पत्याच्या गाडीला गेल्या 6 दिवसांपासून जामर लावला होता. यासंदर्भात वसंत मोरे यांना माहिती मिळताच, वसंत मोरेंनी मोठा हातोडा घेऊन या तीन चाकी गाडीला लावलेला जामर तोडला. एक घाव दोन तुकडे करुन मोरे यांनी ही गाडी पीडित दाम्पत्याच्या ताब्यात दिली. या अपंग बांधवावरील अन्याय मी सहन करु शकत नाही. त्यांच्या गाडीतील माल सडला आहे, आत्ता तुम्हीही डोळ्यानं पाहताय, असे त्यांनी म्हटले. तसेच, माझ्यावर महापालिका कारवाई करणार असेल, तर मला फरक पडत नाही. आत्तापर्यंत 11 गुन्हे दाखल आहेत, हा बारावा गुन्हा होईल, असेही ते म्हणाले.
संबंधित दिव्यांग व्यक्ती टेम्पोच्या माध्यामातून आंबे आणि कलिंगड विकण्याचा व्यवसाय करत होता. मात्र, अनधिकृत पद्धतीने गाडी लावत व्यवसाय करत असल्याचा ठपका ठेवत पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने छोट्या तीन चाकी टेम्पोला जॅमर बसवले. दिव्यांगाकडून याविषयची माहिती पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांना समजली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पोला लावलेल्या जॅमरवर हातोडा मारला.वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडिओही शेअर केला आहे. त्यामध्ये, हातोडा मारुन त्यांनी जामरचे दोन तुकडे केल्याचं दिसून येतंय.
गरिबांच्या मदतीला धावून जातायंत मोरे
कोरोना महामारीच्या संकटात वसंत मोरे हे नागरिकांच्या मदतीला धावून येत आहेत. गोरगरिब आणि ज्यांवर अन्याय होतोय त्यांच्याही हाकेला धावून जात आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने मोरे यांनीच पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. तेच वसंत मोरे उर्फ ‘तात्या’ भेटायला येणार आहेत, असं समजताच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या निवृत्त शिक्षकाचं बिलही माफ झालं होतं. त्यामुळे, जनसामान्य आणि सोशल मीडियातून त्यांच्या कामाचं कौतुक होत आहे.