पुणे : पाटस ते दौंडदरम्यान सबवेच्या कामासाठी रेल्वेकडून घेण्यात आलेला ब्लॉक शनिवारी प्रवाशांच्या संयमाची परीक्षा पाहणारा ठरला. या कामामुळे पुण्यातून सायंकाळी ६.१० वाजता निघालेल्या सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसला दौंडला पोहोचण्यासाठी तब्बल सात तास लागले. पहाटे चार वाजता ही गाडी सोलापूर स्थानकात पोहोचली. त्यापाठोपाठ इतर लांबपल्ल्याच्या गाड्याही खोळंबल्याने हजारो प्रवाशांचे खूप हाल झाले. रेल्वे प्रशासनाने दौंड ते पाटसदरम्यान सबवे बनविण्यासाठी (कॉर्डलाईन) दि. ७ मार्च रोजी ६ तासांचा मेगा ब्लॉक घेतला होता. त्यासाठी काही गाड्या रद्दही करण्यात आल्या होत्या. सायंकाळी ६ पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा रेल्वेला होती. पण हे काम वेळेत पूर्ण न झाल्याने पुढील गाड्यांना विलंब होत गेला. पुण्यातून पुणे-सोलापूर इंटरसिटी गाडी सायंकाळी ६.१० वाजता निघाली. या गाडीच्या पुढे झेलम एक्स्प्रेस होती. इंटरसिटी एक्स्प्रेसला दौंड स्थानकात पोहोचण्यासाठी एक तासाचा वेळ लागतो. पण ही गाडी कासवगतीने पुढे जात-जात रात्री ८.४० च्या सुमारास केडगाव स्थानकात पोहोचली. सबवेचे काम पूर्ण होत नसल्याने ११ वाजेपर्यंत ही गाडी केडगाव स्थानकातच उभी होती. गाडीमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलेही होती. त्यामुळे केडगाव स्थानकात उतरून अनेकांनी मिळेल ते खायला घेतले. पण अनेकांची मोठी गैरसोय झाली. कोणत्याही स्थानकावर प्रवाशांना गाडी कधी निघणार, याची माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे प्रवासीही या प्रकाराबाबत अनभिज्ञ होते. अखेर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ही गाडी दौंड स्थानकात दाखल झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.इंटरसिटी एक्स्प्रेसपाठोपाठ गरीबरथ, चेन्नई एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे दौंड शटल, कोणार्क एक्स्प्रेस, कन्याकुमारी एक्स्प्रेस, पनवेल-नांदेड एक्स्प्रेस, पुणे-दानापूर सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्याही अडकून पडल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला, अशी माहिती दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी दिली.---------------------------प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा रेल्वेचा प्रयत्न असतो. त्यानुसार सबवेचे काम सुरू होते. पण हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. अर्धवट काम सोडून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे शनिवारीच काम पूर्ण करण्यात आले. प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला, याची जाणीव आहे. त्याबाबद्दल दिलगीर आहोत.- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग
पुणे ते दौंड या एक तासाच्या प्रवासाला जेव्हा लागतो सात तासांचा वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 11:23 AM
रेल्वेचा ब्लॉक ठरला प्रवाशांच्या संयमाची परीक्षा पाहणारा
ठळक मुद्दे मध्य रेल्वे च्या पुणे विभागाकडून झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त