लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना महामारीच्या काळात बहुतेक खासगी हाॅस्पिटलने मनमानी पद्धतीने रुग्णांकडून बिल वसूल केले. याबाबत तक्रारी झाल्यानंतर शासनाने ज्यादा बिल आकारणीला चाप लावण्यासाठी शंभर टक्के बिलांचे लेखापरीक्षण करण्यात येत आहे. यात लेखापरीक्षणात आत्तापर्यंत वसूल केलेली रक्कम किती रुग्णांना परत केली आणि किती रुग्णांना परत केली नाही, याचा सर्व तपशील जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुढील सात दिवसांत देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांचे पथक तयार करून त्यांना लेखापरीक्षणाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सर्व रुग्णालयांमधील उपचार घेत असलेल्या रुग्णांचे बिलांचे लेखापरीक्षण करण्यात येत आहेत. त्यामध्ये सर्व बिलांचे पूर्वलेखापरीक्षण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या असून, लेखापरीक्षकांनी रुग्णालयाकडून सर्व देयके रुग्ण डिस्चार्ज होण्यापूर्वी प्राप्त करून लेखापरीक्षण करण्यास सांगितले आहे.