दावडी: खेड तालुक्यातील खरपुडी येथे एका जर्सी गाईला जुळी वासरे झाली आहेत. हि लाखात एक घटना असून ते पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी तुंबळ गर्दी केली आहे .अशा प्रकारची घटना ही दुर्मीळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
खरपुडी येथील माजी उपसरपंच विलास चौधरी या कृतिशील शेतक-याने दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी ५ देशी गाई ३० जर्सी गाईही विकत घेतल्या आहेत. सोबत काही म्हशीही दुग्ध व्यवसायासाठी त्यांनी घेतल्या आहेत. त्यातील एका जर्सी गाईने एकाच वेळी दोन वासरांना जन्म दिला. ही दोन्ही वासरे एकाच रंगांची आहेत.
एकाच वेळी दोन वासरे जन्माला येणे ही लाखातील एखादी घटना असल्याचे रेटवडी येथील पशुवैद्यकीय डॉ दिपक चव्हाण यांनी सांगितले. यातील एक वासरू १२ किलो तर दुसरे ११ किलो वजनाचे असून दोंन्ही वासरे व गाय सुदृढ व सुखरुप आहेत. सकस आहार, योग्य निगा आणि वेळेवर औषधोपचार या त्रिसूत्रीचा वापर करून केलेले संगोपन आणि तज्ञांच्या सल्ल्याने घेतलेली गाईची गर्भावस्थेतील विशेष काळजी यामुळे ही गाय व दोनही वासरे ठणठणीत असून, ती दररोज १५ ते १८ लिटर दूध देते आहे. साधारणपणे ५ टक्के गायीमध्ये जुळे होण्याची शक्यता असते. गुणसूत्रांमधील बदल व अनुवंशिकता या घटकांचा यावर परिणाम होतो. अशा गायी या आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतात असेही ते म्हणाले.