लोणावळा - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भरधाव वेगाने जाणारा कांद्याचा ट्रक वलवण गावाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने उलटला आहे. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. कांद्याचा ट्रक उलटल्याची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी कांदा पळवण्यासाठी मोठी झुंबड होती. आज सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेला कांद्याचा ट्रक हा चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मार्गाच्या सुरक्षा कठड्याला सुमारे शंभर मीटर घासत जाऊन पुढे पुलावरून खाली कोसळला. यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक ठप्प झाली होती. ट्रकमधून मोठ्या प्रमाणात कांदा सर्वत्र पसरला होता हा कांदा पळविण्याकरिता नागरिकांनी मोठी झुंबड करत पोतीच्या पोती भरून कांदे लंपास केले. महामार्ग पोलीस व आयआरबी कर्मचारी यांनी रस्त्यावर पडलेला कांदा बाजूला करत पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरू केली. दरम्यानच्या काळात वाहतूक ही वलवण गावातून वळविण्यात आली होती. सदरच्या अपघातात ट्रकचा पुर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. जखमी चालकावर निगडी येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्य़ाची माहिती पोलिसांनी दिली.