पुणे : शहरात असणाऱ्या भटक्या कुत्र्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी रात्री अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यावर पंधरा ते वीस कुत्र्यांनी हल्ला केला आहे. त्यात संबंधित कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुण्यातील गंज पेठ भागात ही घटना घडली.
अग्निशमन दलात वाहनचालकाचे काम करणारे सतीश श्रीसुंदर हे गंज पेठेतील घोरपडी भागात आठ नंबरच्या महापालिकेच्या कॉलनीत राहतात. या भागात सध्या भटक्या कुत्र्यांचा मोठा वावर असून ती अनेकदा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर येत असतात. आश्चर्य म्हणजे बाहेरून एक व्यक्ती येऊन या कुत्र्यांना बिस्कीट आणि इतर खाद्यपदार्थ रात्रीच्या वेळी खायला देते. त्यामुळे ही कुत्री रात्री अधिक भुंकतात. याबाबत संबंधित व्यक्तीला अनेकदा स्थानिकांनी समाजवलेही आहे. शनिवारी रात्री काम संपल्यावर श्रीसुंदर हे घरी निघाले होते. त्यावेळी कॉलनीच्या सुरुवातीलाच कुत्र्यांना खाणं देऊन एक व्यक्ती निघत होती. श्रीसुंदर शांतपणे निघाले असताना अचानक दोन ते तीन कुत्री त्यांच्यावर भुंकायला लागली. अचानक गांगरलेल्या त्यांनी कुत्र्यांना हटकायचा प्रयत्न केला असता सुमारे १५ ते २० कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना जमिनीवर पडून सुमारे पाच ते सहा ठिकाणी चावे घेतले. त्यांच्या ओरडण्याच्या आवाज ऐकून आजूबाजूचे रहिवासी धावत आल्याने कुत्र्यांनी पळ काढला. या घटनेत त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याबाबत परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून महापालिकेकडे अनेकदा मागणी करूनही भटक्या कुत्र्यांचे निर्मूलन केले जात नसल्याचे सांगण्यात आले.