उरुळी कांचन : उरुळी कांचन-सोरतापवाडी जिल्हा परिषद गटात मतदानाची टक्केवारी ७०.५० टक्के इतकी नोंदवली गेली. या गटातील उरुळी कांचन हे सर्वांत जास्त मतदारसंख्या असलेले गाव आहे. येथील मतदारसंख्या २२५०० इतकी असून, त्यापैकी १२४४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात एकूण २२ केंद्रांत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान करण्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सकाळच्या पहिल्या तासाच्या सत्रात मतदान केंद्रावर कोणता मतदार क्रमांक कोणत्या मतदान केंद्रावर आहे. तसेच अन्य माहितीचे फलक लावले नसल्यामुळे अनेक मतदार मतदान न करता परत गेले. उरुळी कांचन येथे सकाळी १० वाजेपर्यंत मतदान कक्षाचा नकाशा उपलब्ध नसल्यामुळे अनेक मतदार मतदान न करता गेल्याने नागरिकांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. केवळ मतदान कक्ष व स्लीप नसल्यामुळे अनेक जण मतदानाला मुकले. उरुळी कांचन येथे सुमारे ५५ टक्के, तर शिंदवणे येथे ८१ टक्के मतदान झाले. सोरतापवाडी येथे ७२ टक्के, कोरेगाव मूळ ५९ टक्के, वळती ७५ टक्के, तरडे ८१ टक्के, प्रयागधाम ५७ टक्के, पेठ ७९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी सी. व्ही. विपत व मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांनी दिली. ज्योती दीपक सणस ही महिला अत्यंत आजारी होती. परंतु पुतण्या आदित्य सणस व पती दीपक सणस यांनी व्हेन्टिलेटर लावून मतदान केंद्रावर आणले व त्यांचे मतदान करून घेतले, तर वैभवी गायकवाड या अपंग विद्यार्थिनीने मतदानाचा हक्क बजाविला. मतदान स्लिपा मतदारांपर्यंत पोहोचल्या नाहीत.उरुळी कांचन तसेच सोरतापवाडी, तरडे, शिंदवणे, भवरापूर, वळती या परिसरात लोणी काळभोर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक बंडोपंत कौंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)विधानसभा व लोकसभेला आम्ही स्लिपा देतो. इतर निवडणुकीला देत नाही. त्यामुळे आज मतदारांना स्लिपा दिल्या नाहीत.- शहाजी पवार, निवडणूक निर्णय अधिकारी
अपघातात एक ठार
By admin | Published: February 22, 2017 2:17 AM