ओतूर : एसटी बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलचालक जागीच ठार झाला. मोटारसायकलवर मागे बसलेले दोन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना आळेफाटा (ता.जुन्नर) येथे तातडीचे उपचार करण्यात आले. नंतर पुणे येथील वाय.सी.एम. हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. हा अपघात नगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगे फाटा (ता.जुन्नर) हद्दीत बुधवार दि.२५ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला.राणू गेनू धोत्रे (वय ५५) असे मरण पावल्याचे नाव आहे. दशरथ भागाजी धोत्रे (वय ५०) व सुरेश सीताराम सोनवणे (वय ३५, तिघेही रा. आळूची वाडी, पिंपळगाव जोगा, ता.जुन्नर) अशी जखमींची नावे आहेत. उस्मानाबादची भिवंडीकडून उस्मानाबादकडे जाणारी (एम. एच. २० बी. एल. २६३१) बसची समोरून येणाऱ्या मोटार सायकलला (एमएच १४ एआर ६४३०) जोराची धडक बसल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार झाला, तर त्यांच्या पाठीमागे बसलेले दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर एसटीबसचा चालक फरार झाला. त्याला आळेफाटा (ता.जुन्नर) येथे ओतूर पोलिसांनी ताब्यात घेतले. रोहिदास जयद्रथ लोंढे (वय २९, रा.गोजवाडा, ता.वाशी, जि.उस्मानाबाद) असे चालकाचे नाव आहे. ओतूर पोलिसांना ही घटना समजताच ओतूूरचे सहायक पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, पोलीस नाईक के.एच. साबळे, काखिले, मोरे आदी आदी अपघातस्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी पाठवून पंचनामा केला.चालक फरार असल्याने बसमधील प्रवाशांना ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस मित्र अशोक हांडे यांनी बसने ओतूरपर्यंत आणले. प्रवाशांना नगरकडे जाणाऱ्या एसटी. बसमध्ये बसवून दिले. (वार्ताहर)
अपघातात एक ठार; दोन जखमी
By admin | Published: November 27, 2015 1:37 AM