नसरापूर : सातारा-पुणे महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात कारमधील एक जण ठार तर अन्य सात जण जखमी झाले. पुणे बाजूकडे जाणा-या पुणे येथील कार (एमएच १४ डी.अे. ९९६०) मधील सर्वोत्तम देवीदास जोशी (वय ६२, रा. कर्वे रोड, पुणे)हे उपचाराअगोदरच ठार झाले तर अन्य ७ जण जखमी आहेत. एक लहान मुलगी व एका महिलेचा समावेश आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, भोसरी पुणे येथील एका कंपनीमधील कर्मचारी शुक्रवारी महाबळेश्वर येथे सहलीसाठी गेल्याचे समजते. तेथून परत पुण्याकडे येताना कापूरव्होळ- हरिश्चंद्री गावच्या हद्दीत सातारा पुणे महामार्गावर पुणे बाजूकडे कार जात असताना कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गाच्या डाव्या बाजूकडून रस्त्याच्या उजव्या बाजूस विरुद्ध दिशेला गेली.त्या वेळी पुणे बाजूकडून येणाºया ट्रकवर (एमएच ११ बीडी ६००३) आदळली. मात्र ट्रकच्याझालेल्या धडकेने कार परत पुणे बाजूकडे जाणा-या रस्त्यावर जाऊन पडली. यात कारचेही मोठे नुकसान झाले आहे.घटनास्थळी किकवी पोलीस चौकीचे निवास जगदाळे, अनिता रवळेकर, यादव पोलीस आणि पो. नि. सुनील गोडसे ताबडतोब येऊन ग्रामस्थांच्या मदतीने या अपघातातील जखमींना नसरापूर येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले आहे.जखमींची नावे पुढीलप्रमाणे: प्रसाद चंद्रकांत गुजर (वय ४५, रा. मार्केट यार्ड, पुणे), विनायक दीक्षित (वय ४०,रा.सूस रोड, पाषाण, पुणे) तर उर्वरित अन्य ५ जण रा. बावधन पुणे येथील किशोर मेघराज धूत (वय ६०), श्वेता आशिष धूत (वय ३४), कविता आशिष धूत (वय ३), बाबूलाल बलादेराम बिसनोट्टी (वय ४५), अशोक गौर (वय २३) यांचा समावेश आहे. सर्वोत्तम देवीदास जोशी (वय ६२, रा. कर्वे रोड, पुणे) हे उपचाराअगोदरच ठार झाले.
पुणे-सातारा महामार्गावर १ ठार, सात जखमी : चालकाचे नियंत्रण सुटून कार ट्रकवर आदळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 5:18 AM