पुणे : आजकाल सिमेंटच्या जंगलात व कृत्रिम नात्यांमध्ये माणुसकी हरवत चालल्याच्या सध्याच्या अनेक घटनांवरून दिसून येते. मात्र, तरीही काही ठिकाणी माणुसकीच्या झऱ्याचे दर्शन घडते. असाच एक माणुसकीचा झरा पाषाणमधील पॅपिलाॅन सोसायटीतील सदस्यांमध्ये दिसून आला.
साेसायटीत राहणारा कामगार जहांगीर बादशाह शेख (वय ४०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे त्याचे पत्नी जैनतुबी व दोन लहान मुली असलेले कुटुंब उघड्यावर पडले. मात्र, सोसायटीतील रहिवाशांनी मदतीचा हात पुढे केला. एक लाख रुपये गाेळा करून त्या कुटुंबाला देत एक आदर्श निर्माण केला आहे.
शेख यांचा मृत्यू झाल्यावर साेसायटीमधील सदस्यांनी ९० हजार रुपये गाेळा केले. त्यामध्ये सुतारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बालम सुतार यांनी दहा हजारांची भर घालत ती रक्कम शनिवारी सोसायटीच्या एका छोट्या कार्यक्रमात जैतुनबी यांना देण्यात आली.
यापैकी ९० हजार मुलींच्या शिक्षणासाठी पोस्टाच्या दीर्घ ठेव योजनेत गुंतविले व दहा हजार घर खर्चासाठी दिले. तसेच सर्वांनी जैतुनबी हीस धीर दिला व मुलींचे शिक्षण पूर्ण करण्यास सर्वतोपरीने मदत करू, असे आश्वासन दिले. यावेळी रवींद्र पाडळे, भास्कर जाधव, संजय पाटील, किसन भालेराव यासह सोसायटीतील इतर रहिवासी व कर्मचारीदेखील उपस्थित होते.