लोणावळा : मुंबईहून जुगार खेळण्यासाठी लोणावळ्यात आलेल्या ९ जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून जुगारीच्या साहित्यांसह १ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
पोलीस शिपाई विकास कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात त्या सर्वांवर महाराष्ट्र जुगार कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशिष चंपालाल संदेशा (वय ३९ वर्षे), पुष्पराज विमलचंद राठोड (वय ४९ वर्षे), अमित कांतीलाल जैन (वय ४५ वर्षे), हसमुख छगनलाल जैन (वय ४७ वर्षे), कल्पेश प्रकाशचंद जैन (वय ४५ वर्षे), अनिल हिरचंद जैन (वय ४७ वर्षे), सुमित रूपचंद जैन (वय ३८ वर्षे), प्रविणकुमार संपतराज जैन (वय ४६ वर्षे), जयेश बाबुलाल जैन (वय ४५ वर्षे सर्व रा. मुंबई) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड व्हॅली परिसरातील काच बंगल्याशेजारी स्वप्नलोक सोसायटीमध्ये वरील सर्वजण जुगार खेळत असल्याची माहिती लोणावळा पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी याठिकाणी तपासणी केली असता विनामास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करत तीन पत्ती जुगार खेळताना दिसून आले. त्यांच्याजवळ जुगारीचे साहित्य व १ लाख ३१ हजार ४०० रुपयांची रोकड मिळाली. जिल्हाधिकारी पुणे यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पारित केलेल्या आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे याठिकाणी जुगार खेळली जात असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उंडे हे पुढील तपास करत आहेत.