लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्र शासनाकडून राज्य शासनाला लसीचे डोस दिले असून, राज्याने शुक्रवार (दि.९) रोजी पुणे जिल्ह्यासाठी एक लाख लसीचा डोस वितरीत केल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिली. यामुळे शनिवार (दि.१०) रोजी शहर आणि ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गेल्या एक-दोन दिवसापासून पुण्यासह संपूर्ण राज्यातच लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात पुणे शहर आणि जिल्ह्यात शुक्रवार पुरेशी लसच उपलब्ध न झाल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. यामुळेच अनेक केंद्रावर तर लस उपलब्ध नसल्याने बंद राहणार असल्याचे बोर्डदेखील लावण्यात आले. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना लोकांना लसीकरण हा एकमेव मार्ग वाटत असताना आता लसच उपलब्ध होत नसल्याने लोकांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. परंतु अखेर शासनाकडून शुक्रवारी रात्री उशिरा पुणे जिल्ह्यासाठी एक लाख लशीचा डोस उपलब्ध करून दिला आहे. यात पुणे
ग्रामीण भागासाठी 50 हजार, पुणे शहरासाठी 30 हजार आणि पिंपरी-चिंचवडसाठी 20 हजार डोस देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
----