पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा सुरू हाेती. व्हीव्हीआयपी रांगेत बसलेला एक तरुण अचानक उठला आणि मराठा आरक्षणासाठी ‘एक मराठा, लाख मराठा’ची घोषणा देऊ लागला. पोलिसांनी त्याला आवरले आणि खाली बसण्याची विनंती केली. मात्र, तो आक्रमक होत पुन्हा मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी करू लागला. त्यामुळे पोलिस आणि सुरक्षारक्षकांची धांदल उडाली. पोलिस अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी येऊन त्याला शांत करून सभा स्थळावरून दूर नेले. या प्रसंगामुळे सभेतील व्हीव्हीआयपी रांगेत काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मराठा आरक्षणावरून मागील काही महिन्यांपासून वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर रॅलीही झाल्या आहेत. अनेक ठिकाणी मराठा समाज आरक्षणासाठी एकवटल्याचे दिसून आले आहे. जरांगे पाटलांनीही आगामी विधानसभेत आरक्षणावरून रणशिंग फुंकले आहे. आरक्षणाबाबत सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने तुम्ही सरकारच्या उमेदवारांना पाडा असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. अशातच पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत असाच मराठा बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता निवडणुकीनंतर येणारे सरकार मराठा आरक्षणाबाबत काही फेरविचार करणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
शंखनाद अन् मोदी मोदींचा जयजयकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्टेजवर आगमन होताच मोदी...मोदी... या घोषणांचा जयजयकार करण्यात आला. केशव शंखनाद पथकाने शंख वाजवून माेदींचे स्वागत केले.
माझे चित्र, आईचे चित्र मला द्या; मी आभारचे पत्र पाठवितो!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होताच उपस्थितांमध्ये बसलेल्यांपैकी एका व्यक्तीने नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या व्यक्तीने मोदी यांच्या आईचे काढलेले चित्र हातात घेऊन दाखवत होते. माझे चित्र आणि आईचे चित्र मला द्या, मी त्यांना आभाराचे पत्र पाठवितो, असे नरेंद्र मोदी यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम यांची प्रतिमा देऊन केला सत्कार
शहर भाजपच्यावतीने संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा, पगडी देऊन पंतप्रधानांचा सत्कार केला. त्यानंतर महायुतीच्या सर्व घटक पक्षामधील शहराध्यक्षांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचीही प्रतिमा भेट देण्यात आली.