दुग्गूच्या उजव्या हाताला जन्मतःच दोन अंगठे होते. दुग्गूची मनःस्थिती ओळखून प्रेमाने त्याला जवळ घेत वडील म्हणाले, "दुग्गू, या जादा अंगठ्याची तुला अजिबात गरज नाही हे सिद्ध करून दाखव मला. अरे, असे बोट लाखात एखाद्यालाच लाभते. 'लाखों में एक' आहेस तू. इतर मुलं चिडवतात म्हणून बोट काढून टाकण्याचा विचार करण्यापेक्षा फक्त तुझ्याकडेच असलेल्या या अंगठ्याचा अभिमानच बाळगला पाहिजेस तू! स्वतःला अशा मर्यादित, न्यूनगंडात अडकवू नकोस. आयुष्यात असं काहीतरी करून दाखव, ज्यामुळे तू लोकांच्या लक्षात राहशील, या अंगठ्यामुळे नव्हे." वडिलांच्या प्रेमळ पण तितक्याच कणखर सल्ल्याचा दुग्गूवर परिणाम झाला. त्याने त्याच्या आवडीच्या व्यायाम आणि नृत्यावर लक्ष केंद्रित करून शरीरसौष्ठव व नृत्यनिपुण होण्यासाठी कसून मेहनत घेतली.
कालांतराने वडिलांना सहायक म्हणून मदत करीत असताना एक दिवस अचानक अभिनेता शाहरुख खानच्या शिफारशीवरून त्याच्यात वडिलांची निर्मिती असलेल्या चित्रपटात त्याला नायक म्हणून संधी मिळाली. संधीचे सोने करत दुग्गू रातोरात स्टार झाला. वडिलांच्या प्रेरणेमुळे न्यूनगंडावर मात करत केवळ शरीरसौष्ठव, नृत्यकौशल्यच नाही, तर एक उत्तम अभिनेता म्हणूनही 'दुग्गू' म्हणजेच अभिनेता हृतिक रोशन खरोखरच 'लाखों में एक' झाला.
- प्रसाद भडसावळे