पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषित झालेल्या मुळा-मुठा नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी पुणेकरांनीच पुढाकार घेऊन एक लाख स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. ‘वुई पुणेकर’ या संस्थेतर्फे ही मोहीम हाती घेण्यात आली असून, यामध्ये अनेक संस्था आणि नागरिकांचा सहभाग आहे. आज सायंकाळी एक लाख स्वाक्षरी मोहीम झाल्यानंतर ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’च्या प्रतिनिधींनी माहिती घेतली आहे. पुणे शहरातील सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. त्यात ऑक्सिजन तर नाहीच; पण नदीकाठी गेले तर घाण वास सहन करावा लागतो. जणू काही ते गटारच आहे. हीच नदी आता स्वच्छ करण्यासाठी अनेक संस्था, नागरिक एकत्र आले आहेत. त्यांच्यामार्फत विविध उपक्रम हाती घेतले असून, एक लाख स्वाक्षरी मोहीम त्याचाच एक भाग आहे. सरकारकडून नदी स्वच्छतेसाठी जायका प्रकल्प मंजूर केला आहे. परंतु, तो चार वर्षे झाली असून तसाच पडून आहे. त्याला काहीही गती मिळालेली नाही. सध्या केंद्रीय जलसंसाधन समिती या जायका प्रकल्पासाठी पुण्यात आली आहे. याविषयी ‘वुई पुणेकर’च्या सदस्या उमा खरे म्हणाल्या, की नदीसाठी काम करणाºया संस्थांना एकत्र आणले असून, त्याद्वारे चला मुळा-मुठा पुनरुज्जीवित करू या, ही मोहीम घेतली आहे. नदी सांडपाणी, कचरामुक्त, अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आज सातारा रस्त्यावरील वाळवेकर लॉन्स येथे महाराष्ट्रातील २२ संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त मुळा-मुठा स्वच्छता चळवळीची जोड दिली. त्यामुळे हजारो नागरिकांनी पादुकांचे दर्शन घेऊन नदी स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे.’’........गेल्या काही दिवसांपासून मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आज एक लाख नागरिकांनी स्वाक्षरी केल्या आहेत. या स्वाक्षऱ्या पुणे महापालिका आयुक्त, महापौर आणि मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार आहेत. स्वाक्षरी घेऊन आम्ही पेटिशन दाखल करणार आहोत. सरकारी यंत्रणा मदत करो वा नको, आम्ही नागरिकांच्या माध्यमातून नदी स्वच्छ करणार आहोत. नदी स्वच्छतेसाठी एक लाख नागरिकांच्या स्वाक्षरीचा उपक्रमाची माहिती ‘गिनीज बुक रेकॉर्ड’च्या प्रतिनिधींना दिली आहे. सामाजिक कामासाठी नागरिकांकडून हा एक विक्रमच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. - राज देशमुख, वुई पुणेकर .
मुळा-मुठा नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी लाखभर स्वाक्षरी मोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 2:10 PM
पुणे शहरातील नदीकाठी गेले तर घाण वास सहन करावा लागतो...
ठळक मुद्दे ‘वुई पुणेकर’चा उपक्रम, नागरिकांनी घेतला पुढाकार गिनीज बुक रेकॉर्डने घेतली माहिती