लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाची दुसरी लाट आणि झालेले लाॅकडाऊन यामुळे हजारो लोकांना अद्याप म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करता आला नाही, यामुळेच ही अडचण लक्षात घेऊन आता म्हाडाच्या २ हजार ९०८ घरांसाठी अर्ज करण्यास तब्बल एक महिन्यांची मुदतवाढ दिल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी सांगितले.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील तब्बल २९०८ घरांची सोडत काढण्यात आली.
कोरोना संकट असतानाही सहा महिन्यांत दोन वेळा आणि तेही तब्बल दोन हजारपेक्षा अधिक घरांची सोडत काढण्याचा नवा विक्रम पुणे म्हाडाने केला आहे. यात सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यांतील म्हाडाच्या २१५३ सदनिका व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील प्राप्त झालेल्या ७५५ सदनिका अशा एकूण २९०८ सदनिकेची अंतिम नोंदणीसाठी १३ मेपर्यंत मुदत आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव सदर जाहिरातीमधील योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली. आता अर्जदारांना दिनांक १३ जून २०२१ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करून अर्ज करता येईल. अर्जदारांनी सुवर्णसंधी समजून जास्तीत जास्त अर्ज करावे व आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी केले आहे.