बारामती (पुणे) : करायचं तर एक नंबर करायचं नाहीतर आपण त्याच्या नादाला लागत नाही. राज्यातील विकासकामे करताना मी मनापासून ती कामे करतो. बारामतीला राज्यातील सर्वात विकसित तालुका करायचा आहे. त्यासाठी राज्यातील नेते साथ देतील, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदा बारामतीत येत आहेत. त्यांचे बारामतीकरांकडून मनापासून स्वागत करत आहे, असंही पवार म्हणाले. कार्यक्रमाला उशीर झाल्याने पवार यांनी दिलगिरीही व्यक्त केली. बारामतीत 'नमो महारोजगार मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी ते बोलत होते.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत बारामती येथे २ आणि ३ मार्च रोजी पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी हा भव्य मेळावा होत आहे. या मेळाव्याकरिता आजपर्यंत ३४७ आस्थापना सहभागी झाल्या असून त्यांच्याकडून ५५ हजार ७२ रिक्तपदे अधिसूचित करण्यात आली आहेत. तर आतापर्यंत ३३ हजारावर युवक-युवतींनी रोजगारासाठी नावनोंदणी केली आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, आमदार दत्ता भरणे उपस्थित होते. ज्या विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यासाठी नावनोंदणी केली ते सर्वजण यावेळी उपस्थित होते.