मुळशी : पुणे - दिघी बंदर महामार्गांवर माले (ता. मुळशी ) गावच्या हद्दीत असलेल्या शेडाणी फाटा येथे एस टी बस खाली सापडून एकाचा जागीच मृत्यू झाला. तानाजी गोविंद मराठे (रा. चाचीवली ता. मुळशी अंदाजे वय- 65) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, ता. 15 रोजी दुपारी 2.30 ते 3 च्या सुमारास पुण्याहुन कोकणाकडे निघालेल्या पिंपरी - चिंचवड - दापोली ही बस क्र. एमएच 14 - बीटी 4609 ही शेडाणी फाट्यावर प्रवाशांना सोडण्यासाठी थांबली होती. त्याच बसने चाचीवलीला जाण्यासाठी तानाजी मराठे हे चाचीवली वरून शेडाणी फाट्याला साहित्य खरेदी करण्यासाठी आले होते. साहित्य खरेदी करुन त्यांना परत चाचीवली गावाला जायचे होते. बस पकडण्यासाठी उजव्या बाजूकडून येऊन डाव्या बाजूला येण्यासाठी रस्ता ओलांडत असताना वाहन चालकाचे समोरून येणाऱ्या मराठे यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांना बसचा धक्का लागला. ते ज्या बसने गावी जाणार होते. त्याच बसखाली सापडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मराठे हे बसच्या उजव्या बाजूच्या चाकाखाली सापडले आणि त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर बराच वेळ त्यांचा मृतदेह जागीच पडून होता. मृताची ओळख पटल्यानंतर मृताचे नातेवाईक घटना स्थळी आले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पौड ग्रामीण रुग्णालयात हलविला. तानाजी मराठे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली आहेत. शिवसेना नेते सचिन पळसकर यांचे ते मामा होते. या अपघातानंतर बेजबाबदारपणे बस चालवल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांविरोधात तसेच चुकीच्या पद्धतीने महामार्गाचे काम करणाऱ्या एमएसआरडी विभाग व कंत्राटदाराच्या विरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच शेडाणी फाटा हा नेहमी अधिक रहदारीचा तसेच वेड्यावाकड्या वळणाचा असल्याने या ठिकाणी सूचना फलक व गतीरोधक बसविणे आवश्यक आहे.