चाकण : परिसरातील अनेक एटीएम सेंटर्समधून पैसे काढायला आलेल्या एटीएमधारकांना हातचलाखीने फसवून पैसे काढणाऱ्या ठगाला चाकणपोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून जवळपास ८७ एटीएम कार्ड्स पोलिसांनी जप्त केली आहेत. रोहित ओमशंकर मधुकर शर्मा (वय २५, रा. धर्मा निवास, कोणगाव, कल्याण, जि. ठाणे, मूळ रा. मधुबनी, पूर्णिया, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी उमेश प्रमोद शितोळे (वय २४, रा. चाकण, ता.खेड, जि.पुणे ) हे कोहिनूर सेंटरमधील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले. यावेळी बाजुला उभा असलेला आरोपी रोहित याने पैसे काढून देण्याचा बहाणा करून स्टेट बँकेचा पिन नंबर पाहून हातचलाखी करून फिर्यादीच्या एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवून स्वत:जवळील स्टेट बँकेचे दुसरे एटीएम कार्ड फिर्यादीला देऊन निघून गेला. यावेळी कार्ड बदलल्याचे लक्षात येताच त्यांनी चाकण पोलिसांना फोनवरून माहिती दिली. चाकण पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपीचा माग घेतला. तो चाकण-तळेगाव रस्त्यावर राणूबाई मळ्याच्या हद्दीत दिसताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे एसबीआय बँकेचे १७, युनियन बँकेचे ८, अॅक्सिस बँकेचे ४, बँक आॅफ बडोदाचे ६, बँक आॅफ इंडियाचे ६, बँक आॅफ महाराष्ट्राचे २ व इतर वेगवेगळ्या बँकांचे मिळून एकूण ८७ एटीएम कार्ड्स सापडले. या आरोपीने फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याबाबत त्याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकटआरोपी रोहित शर्मा याच्याविरोधात अशा प्रकारे फसवणुकीचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. लोकांचे पैसे काढून देतो, असा बहाणा करून एटीएम कार्डचा पिन नंबर पाहून नंतर लोकांना परत दुसरेच एटीएम कार्ड देऊन लोकांकडून घेतलेल्या एटीएममधून पैसे काढून लोकांची फसवणूक करण्याची त्याची पद्धत आहे. चौकट ——-आपले एटीएम कार्ड पैसे काढण्यासाठी अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नये, एटीएमचा पिन नंबर कोणाला सांगू नये, तसेच एटीएममध्ये पिन नंबर टाकताना कोणास दिसणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन चाकण पोलिसांनी केले आहे.
चाकण येथे हातचलाखीने एटीएमधारकांना गंडविणारा जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 7:39 PM
अनेक एटीएम सेंटर्समधून पैसे काढायला आलेल्या एटीएमधारकांना हातचलाखीने फसवून पैसे काढणाऱ्या ठगाला अटक केली आहे.
ठळक मुद्देचाकण पोलिसांची कारवाई : ८७ एटीएम कार्डसह आरोपीला अटक