बेल्हा (पुणे) : मोटारसायकल झाडाला धडकून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला आहे. याबाबत आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश अशोक जाधव व समीर बाळू जाधव हे दोघेही पळशी (ता.पारनेर) येथील राहणारे असून, हे दोघेही (दि.१३) रोजी रात्री एक वाजण्याच्या जुन्नर तालुक्यातील शिरोली या गावी काही कामाच्या निमित्ताने मोटारसायकल (क्र.एम.एच.१६.ए.यु. ०१५२) वरून जात होते.
त्यावेळी मोटारसायकल समीर जाधव हा चालवित होता. यावेळी त्यांची मोटारसायकल नगर-कल्याण महामार्गावरील पेमदरा (ता.जुन्नर) येथील गावाजवळ असलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडाला जोरदार धडकल्याने, यामध्ये समीर जाधव (वय १९) याच्या डोक्याला व तोंडाला गंभीर मार लागल्याने दुखापत झाली होती, तर प्रकाश जाधव यास कपाळाला व पायाला जोरदार मार लागला. समीर जाधव यास डोक्याला मार लागल्याने, स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता, डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या संदर्भाची फिर्याद प्रकाश जाधव याने आळेफाटा पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.