कुरकुंभ (पुणे) : मळद येथे शुक्रवारी ( दि. ७ ) रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या भुयारी मार्गावर लोखंडी सुरक्षा कठडे बसविणाऱ्या कंत्राटदाराच्या उभ्या असलेल्या महेंद्र बोलेरो पीकअपला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या मारुती स्विफ्ट डिझायर या गाडीने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मळद येथे महामार्गावर सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. मळद येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळील भुयारी मार्गावरील लोखंडी सुरक्षा कठडे बसविण्याचे दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. हे काम संपून कंत्राटदाराचे कामगार व पीकअप( क्रमांक एमएच. ४२ एम.४९२६) चालक रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून चहा पिण्यासाठी गेले होते. हे पीकअप रस्त्यावरच कडेला उभे असल्याने पाठीमागून भरधाव वेगात जाणारी (एमएच.१४ एफसी.१७४८० कार पीकअपला पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार झाला. तर कार मधील अन्य एक व पीकअपमधील एक कामगार असे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात मृत व जखमी झालेले व्यक्तीची नावे व पत्ता रात्री उशिरापर्यंत समजू शकलेले नाही. जखमींना उपचारासाठी तातडीने दौंड मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारच्या पुढील बाजूचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर लोखंडी सुरक्षा कठड्याचे साहित्य महामार्गावर पसरले होते. त्यामुळे सोलापूर-पुणे मार्गाची वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.