खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी व्हॉट्सॲपद्वारे मिळाल्याची माहिती समोर आली होती. ”तू दिल्लीमध्ये भेट तुला एके ४७ ने उडवतो, तुझा मूसेवाला करतो तू आणि सलमान फिक्स," अशा आशयाची ही धमकी असून याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिल्याचेही समोर आले होते. दरम्यान, यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं एकाला ताब्यात घेतलं आहे.
राहुल तळेकर असं त्या व्यक्तीचं नाव असून पुण्यातील गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेतलं. मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस यांच्या गुन्हे शाखेनं संयुक्त कारवाई करत पुण्यातील खराडी भागातून राहुल तळेकर या व्यक्तीला ताब्यात घेतलंय.
ताब्यात घेतल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राहुल तळेकर या व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरातील जयशंकर हॉटेलमधून या तरुणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबई पोलिसांनी माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ या प्रकरणी कारवाई करत लगोलग या तरुणाला ताब्यात घेत मुंबई पोलिसांच्या ताब्यात सोपवलं. मुंबई पोलीस या तरुणाला घेऊन रात्रीच रवाना झाले.
काय आहे प्रकरण?"तू दिल्लीमध्ये भेट तुला एके ४७ ने उडवतो, तुझा मूसेवाला करतो तू आणि सलमान फिक्स," अशा आशयाची ही धमकी संजय राऊत यांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देण्यात आली होती. त्यानंतर यासंदर्भातील माहिती पोलिसांना देण्यात आली.