पुणे: बंदी असलेल्या नॉयलॉन मांजामुळे पुण्यात झालेल्या तीन अपघातांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या मांजाची विक्री कुठे होत आहे, याची तपासणी करून संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, तसेच महापालिका आयुक्तांना दिले आहे.
पंतग उडवताना वापरण्यात येणारा हा मांजा नेहमीच्या सुती मांजासारखा नाही. तो नॉयलॉन धाग्यापासून तयार केलेला असतो. चीन तसेच अन्य काही दक्षिण आशियाई देशांमधून तो भारतात मागवला जातो. रस्त्याने वाहन चालवत असलेल्या चालकाच्या मानेत, डोळ्यांत वा हातामध्ये हा मांजा अडकला तर थेट कापले जाते. खोलवर जखम होते. त्यामुळेच या मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही अनेक विक्रेते या मांजाची विक्री करतात. पेच झाल्यानंतर तो लवकर तुटत नसल्याने पंतगबाज युवकांकडून त्याला मोठीच मागणी आहे. त्यामुळेच बंदी असूनही त्याचा सर्रास वापर होत असतो.
त्याचीच दखल डॉ. गोऱ्हे यांनी घेतली आहे. त्या म्हणाल्या की, पुण्यातील अनेकांनी प्रत्यक्ष भेटीत, तसेच फोनवर यासंबंधी तक्रार केली. पोलिस किंवा प्रशासन यासंदर्भात काहीच करत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वारजे, कात्रज-कोंढवा आणि धनकवडी या परिसरात मागील आठवड्यात अशाच तीन गंभीर घटना घडल्या. एका व्यक्तीच्या गळ्याला १५ टाके पडले आहेत तर एकाच्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. प्रशासनाच्या निष्क्रियपणामुळेच हे अपघात होत असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
वरवरची कारवाई यामध्ये करून उपयोग नाही. मांजा आयात जिथून होतो तिथपासून ते साध्या विक्रेत्यापर्यंत याची साखळी मोडीत काढणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे प्रशासनाला निर्देश दिले असल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. कारवाई करणाऱ्या सर्व यंत्रणांना एकत्र करून कारवाईसंबंधी एक धोरणच तयार करावे व त्याची माहिती तत्काळ द्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. आवश्यक असल्यास यामध्ये स्वयंसेवी संस्था, संघटना यांचीही मदत घेण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.