पुणे : प्रभात रस्त्यावर गेल्या शनिवारी रात्री बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करणा-या दोघा हल्लेखोरांपैकी रवी सदाशिव चोरगे याला पुणे पोलिसांच्या पथकाने परराज्यातून ताब्यात घेऊन त्याला रविवारी रात्री उशिरा अटक केली. शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांची हत्या करताना प्रभात रोडवरील सायली अपार्टमेंटमधील सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोरांचे फुटेज पोलिसांना मिळाले होते. त्यातून त्या दोघांची नावे रवी चोरगे आणि राहुल शिवतारे अशी असल्याचे समजले होते. हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यातील रवी याच्यावर यापूर्वी मारामारीच्या गुन्ह्यांची नोंद असून राहुलविरोधात ग्रामीण पोलिसांकडे खुनाचा गुन्हा दाखल आहे. तसेच खडक पोलिसांनी त्याला एका प्रकरणात यापूर्वी अटक केल्याचे समजते. दोघेही हल्लेखोर हे पूर्वी नवी पेठेत राहत होते.रवी चोरगे आणि राहुल शिवतारे यांचा पौड येथील जमिनीच्या व्यवहारातील कमिशनवरून मागील एक वर्षांपासून देवेन शहा यांच्यासोबत वाद सुरू होते. पोलिसांनी केलेल्या तपासात रवी चोरगे याचे मुंबईतील अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यापासून डेक्कन पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी दोघांच्याही कुटुंबीयांकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी या दोघांबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले.गेल्या आठ दिवसांपासून डेक्कन पोलीस तसेच गुन्हे शाखेची विविध पथके या दोघांच्या मागावर होती. अगदी मध्य प्रदेशापासून राज्याच्या विविध शहरांत शोध घेण्यात येत होता. डेक्कन पोलीस ठाण्याचे एक पथक मध्य प्रदेशात गेले होते. या तपासासाठी माहिती इतरांना समजू नये, यासाठी या पथकातील अधिकारी व कर्मचा-यांकडील मोबाईल बंद करायला सांगून त्यांच्याकडे दुसरे मोबाईल देण्यात आले होते. अतिशय खबरदारी घेत हल्लेखोरांपैकी रवी चोरटे याला ताब्यात घेऊन रात्री उशिरा अटक करण्यात आली.
देवेन शहा खूनप्रकरणी एक जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 3:13 PM