विमाननगर : येरवड्यात शनिआळी परिसरात पिंपळाच्या झाडाची फांदी अंगावर पडून दोन जण जखमी झाल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. सलिम कासम शेख (वय, ४९, रा. शनिआळी, येरवडा) हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर या घटनेत आणखी एक जण जखमी झाला. या घटनेमुळे महानगरपालिका प्रशासनाची उदासीनता स्पष्ट होते. वांरवार तक्रारी करून देखील धोकादायक झाडे काढली जात नाहीत.त्यामुळे वांरवार असे अपघात घडत आहेत.
गुरूवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील शनिआळी परिसरात हि घटना घडली. सलिम शेख हे घरातून बाहेर जात असताना अचानक झाडाची फांदी त्यांच्या अंगावर कोसळली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. तर आणखी एक इसम किरकोळ जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी तात्काळ खाजगी रूग्णालयात दाखल केले. या परिसरातील हे धोकादायक झाड असून गेल्या अनेक दिवसांपासून वांरवार तक्रारी करून देखील त्याची दखल महानगरपालिका प्रशासनाने घेतली नाही. एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावर महानगरपालिका प्रशासनाला जाग येणार कां ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.