पिंपरी : डिलीव्हरी बॉयच्या भरधाव दुचाकीच्या धडकेने एक जण गंभीर जखमी झाला. तसेच त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. हिंजवडी आयटीपार्क फेज – 1 येथे बुधवारी (दि. 18) साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सचिन राजू ऊर्फ राजाराम साळुंखे (वय 27, रा. माणगाव, साळुंखेवस्ती, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास राजू डामसे (वय 29, रा. माणगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डिलीव्हरी बॉयचे नाव आहे. तर राजू ऊर्फ राजाराम काळुराम साळुंखे असे अपघातात जखमी झालेल्याचे नाव आहे.
आरोपी विकास डामसे याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांचे वडील राजू ऊर्फ राजाराम साळुंखे यांना धडक दिली. यात दुचाकीचे नुकसान होऊन साळुंखे गंभीर जखमी झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
रिक्षाच्या धडकेने सायकलस्वार जखमी : भरधाव रिक्षाने धडक दिल्याने जेष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. यात सायकलचेही नुकसान झाले. रिक्षाचालक अपघातस्थळी न थांबता पळून गेला. निगडी येथे शनिवारी (दि. 21) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सोमनाथ गुजाबा गायकवाड (वय 35, रा. रुपीनगर, तळवडे, मूळगाव जाकनगाव, ता. खटाव, जि. सातारा) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुजाबा कोंडीबा गायकवाड (वय 60) असे या अपघातात जखमी झालेल्या जेष्ठ नारिकाचे नाव आहे. फिर्यादी सोमनाथ यांचे वडील गुजाबा हे सायकलवरून घरी जात होते. त्यावेळी भरधाव रिक्षाने त्यांच्या सायकलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात गुजाबा गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रिक्षाचालक अपघातस्थळी न थांबता निघून गेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.