पुणे: एखाद्या गायकाच्या कार्यक्रमात मोठा अभिनेता आला तर लगेच सर्वजण त्याच्यामागे पळतात. सर्वांचे लक्ष तो वेधून घेतो, पण समोर जो कलाकार गायन कला सादर करत असतो, त्याच्याकडे दुर्लक्ष होते. खरंतर प्लेबॅक सिंगर होऊ नये, तर खराखुरा गाणारा सिंगर व्हायला हवे, असा सल्ला प्रसिद्ध गायक कैलास खेर यांनी दिला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी (दि.६) आयोजित सांस्कृतिक कट्ट्यावर कैलास खेर यांच्याशी संवाद झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव आणि खजिनदार शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. याप्रसंगी कैलास खेर यांनी आपला जीवनप्रवास उलगडला.
कैलास खेर म्हणाले, ‘‘मी लहान असताना माझ्या घरी एक सिद्धपुरुष आले हाेते. तेव्हा त्यांनी माझ्या आईला सांगितले की, हा मुलगा काही तरी दिव्य करेल. त्याला सांभाळा. मी लहानपणी चौथ्या वर्षांपासून गायला सुरुवात केली. मला आवडतं म्हणून मी गातो. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी मी गात नाही. माझ्या गाण्यातून लोकांना एक प्रकारचे समाधान मिळते. हे खरे सुख आहे. मी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले नाही किंवा मला कोणी गुरू देखील नाही. मी एकलव्यसारखे गायन शिकलो. मी गाताना माझ्याच धुंदीत गातो.’’
ओठ हलवणारा गायक नव्हते व्हायचे !
‘‘मी जेव्हा मुंबईमध्ये गायनासाठी आलो, तेव्हा मला खूप नकार मिळाले. पडद्यावर ओठ हलवणाऱ्या कलाकारांना खूप भाव दिला जातो, पण मला ओठ हलवणारा गायक व्हायचे नव्हते. त्यामुळे मी माझी वेगळी शैली निर्माण केली. खरा कलाकार तोच असतो, जो कल को आकार दे !,’’ अशा भावना कैलास खेर यांनी व्यक्त केल्या.