पुणे : पुणे व पिंपरी शहरात जाहीर करण्यात आलेला निर्णय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन घेण्यात आलेला नाही. या निर्णयामुळे पुन्हा एकदा समाजातील विविध घटकांचा रोजगार बुडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी फक्त अधिकाऱ्यांशी चर्चा करून लॉकडाऊनचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. त्यांचे हम करे सो कायदा हे धोरण चुकीचे आहे. यापुढे जर पुण्याच्या बाबतीत असे निर्णय घेतले तर काय करायचं ते आम्ही बघून घेऊ, अशा तीव्र शब्दांत लॉकडाऊनला विरोध दर्शवत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले.
पुणे शहरात वाढत चाललेल्या कोरोना बाधितांच्या साखळीला अटकाव घालण्यासाठी अजित पवार यांनी काल पुण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात पुन्हा एकदा पुणे व पिंपरीत १० जुलै ते २३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असा १० दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्देश पवारांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. मात्र या निर्णयावर पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी जोरदार टीका केली आहे.
बापट म्हणाले, पुण्यातील 4 टक्के कोरोना बाधितांसाठी ९६ टक्के पुणेकरांना लॉकडाऊनसारखे पाऊल उचलून वेठीस धरणे अत्यंत चुकीचे आहे.तसेच या निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना दूर ठेवण्यात आले. हेच लोकप्रतिनिधी कोरोनाच्या काळात फिल्डवर काम करत आहे. आत्ताच कुठे रुळावर येत असलेली घडी पुन्हा एकदा या लॉकडाऊनमुळे विस्कटणार आहे. यापुढे जर असे निर्णय अजित पवारांनी पुण्याच्या बाबतीत घेतले तर आम्ही बघून घेऊ काय करायचं ते असा इशारा देखील त्यांनी अजित पवारांना दिला आहे.