सोमेश्वरनगर : कोरोनाबाधित आजीबाईंची प्रकृती खालावली, शरीर हालचाल करेनासा झाले, डोळेही उघडेना..शेवटी मग आजीबाईंचे निधन झाल्याचे समजुन नातेवाईकांना फोन केले. अंत्यसंस्काराची तयारी झाली. मात्र, थोड्याच कालावधीने आजीबाईंनी डोळे उघडले...अन् कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचे एका क्षणात आनंदात रूपांतर झाले. हा ज्यांना ज्यांना आजीबाई गेल्याची दुःखद वार्ता कळवली होती त्यांना परत आजीबाई जिवंत असल्याचे फोनकरून कळवावे लागले.
बारामती तालुक्यातील मुढाळे येथे सोमवारी (दि. १०) हा प्रकार घडला. लिलाबाई चव्हाण वय ७६ (बदललेले नाव) यांना गेल्या वीस दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. यामुळे आजीबाई विलगीकरणात होत्या. वृद्धापकाळामुळे शरीर प्रकृती साथ देत नव्हती. हालचाल करता येत नव्हती. यामुळे घरातील सदस्यांनाही सेवा कशी करावी याबाबत कोडे पडले होते. संपर्कात जावे तर बाधा होईल. यामुळे थोडे अंतर राखून सेवा सुरु होती.
गेल्या दोन दिवसात प्रकृती अधिक खालावली आणि आजीबाई डोळे सुद्धा उघडत नाहीत असे पाहून घरातल्या सदस्यांनी बारामतीला दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. गाडी घेऊन जाताना आजीबाईंनी काहीच प्रतिसाद दिला नाही. दवाखान्यात दाखल करावे तर बेड शिल्लक नाहीत. अशा परिस्थितीत आजीबाई निपचित पडून राहिल्यामुळे गाडीतल्या सदस्यांना वाटले आजींचे निधन झाले आहे आता थेट घरी घेऊन जावं. त्यामुळे तेथूनच पाहुण्यांना फोन केले. निधन वार्ता कळवली .गाडी घरी आली आणि अंत्यसंस्काराची तयारी झाली. कोरोनाबाधित असल्यामुळे फार असं कोण जवळ गेला नाही. आजुबाजुला नातेवाईकांची आर्त हाक ऐकुन आजीबाईंनी डोळे उघडले. आणि सर्वांना आश्चर्याचा एकच धक्का बसला.
कोरोनाच्या संसर्गामुळे एकमेकांना स्पर्श करणे धोक्याचे ठरत असल्याची भावना सर्वांच्या मनात घर करून बसल्याने असे प्रसंग ओढावत आहे. कोरोनाच्या धास्तीने पोटची अपत्यही जवळ येत नाहीत. परिणामी मृत्यूची खात्री सुद्धा करणे धोक्याचे वाटत आहे. यातुन कोरोनाबाधितांचे अंत्यसंस्कार म्हणजे एक कोडंच बनले आहे. लवकर विधी करून मोकळे व्हावं....ही घाई अंगलट आली असती. जिवंतपणी सरणावर ठेवण्याच्या तयारीला कोरोनाची भीतीच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. ----------------------