राजू इनामदार
पुणे : मुलखाचा कंटाळा आलेला आहे. कशातच राम वाटेनासा झाला आहे. डोळे पेंगुळलेत. अंगात आळस भरलाय. अशा वेळी हातात कोणीतरी कॉफीचा मग आणून द्यावा. वाफाळलेल्या मगच्या कडेला ओठ लागावेत; तोच कॉफीचा गंध नासिकेत शिरावा आणि शरीर थरथरावे. मग एकच घुटका व सगळ्या शरीरात तरतरी. ही अतिशयाेक्ती नाही. असे खरोखरच होते.
प्यायचेही शास्त्र
आनंद हवा असेल तर कॉफी प्यायचे जे शास्त्र आहे, त्यानुसारच ती घ्यायला हवी. उगीच एखाद्या लहान कपात, गरम दुधात पावडर घातलेली कॉफी पिणे हा त्या पेयाचा अपमान आहे. आपल्याकडे तो सातत्याने सुरू असतो. काॅफी पितात मद्रास वगैरेकडील लोक. त्यांना खरोखरच माहीत आहे कॉफी करायची कशी व प्यायचीही कशी.
बिया दळून होते तयार
आफ्रिकेतून कोण्या काळात जगभर प्रवास करता झालेली ही बी. हो कॉफीची ‘बी’च असते. ती दळावी लागते. तिची पावडर म्हणजे अगदी भुकटी करायची. हे दळण दळायचीही विशेष पद्धत आहे. धान्य जसे कशावरही, काहीही दळलेले चालत नाही; तसेच कॉफीच्या बिया या कॉफीच्या बियांवरच दळाव्या लागतात. तिथे दुसरे काही आधी किंवा नंतरही लावलेले असले तर मग मूळ चव बदलली, असे खात्रीने समजा. त्यामुळेच फार काळजीने हे काम केले जाते.
अशी करायची
गरम उकळत्या पाण्यात चमचाभर कॉफी टाकून (हे पाणी अर्थातच मगमध्येच हवे) ती लहानशा चमचाने ढवळायची. हवी असेल तर साखर. दूध खरे तर मूळ कॉफीत नव्हतेच. ते भारतीयांनी केले. (चहाचेही तेच झाले.) खरी कॉफी दूध नसलेलीच. तरीही विशिष्ट प्रमाणात टाकले तर दूधही चांगलेच लागते.
असंख्य प्रकार
अलीकडे कॉफीचे कितीतरी प्रकार निघालेत. क्रीमवाली, फेसवाली. आता तर त्यावर चॉकलेटचा छान बदाम वगैरेही काढून देतात. कॉफीचे मगही वेगवेगळ्या आकारांचे असतात. ती ढवळायच्या चमच्यांचेही असंख्य प्रकार. अशी शाही, दिमाखदार वागणूक मिळावी अशीच आहे कॉफी. फक्त पाण्यातील कॉफी पाहावी तसेच दूध टाकलेलीही. तिचा रंगच उत्साहवर्धक आहे. गंध मधुर आहे. चव स्वर्गसुख देणारीच आहे. थंडीचे दिवस आहेत. कॉफी प्यायची वेळ झाली आहे.
कुठे मिळेल : रास्तापेठेत साउथ इंडियन सोसायटी, तिथून पुढे केईएमसमोर पूना कॉफी हाऊस, बहुसंख्य स्ट्रीट कॉफी स्टॉल्स.कधी घ्यावी : शक्यतो दिवस मावळताना, नाहीतर मग एकदम उत्तररात्री. त्यातही थंडीच्या, पावसाच्या दिवसांत तर कधीही.