पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे दिली. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेगवेगळ्या बैठकांनंतर पवार कुटुंबात उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा टीका केली आहे. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय चाललंय हेच कळत नाहीये. विरोध पक्ष कोणता असा प्रश्न पडतोय. जोपर्यंत समाज असा आहे तोपर्यंत सरकार असेच वागणार आहे. राष्ट्रवादीची पहिली टीम रवाना झाली, दुसरी टीम रवाना होईल हे मी आधीच सांगितले होते. आजही भेटीगाठी सुरू आहेत. शरद पवारांचे राजकारण तुम्ही किती वर्ष बघताय? हे सगळी मिलीभगत आहे असं राज ठाकरे म्हणाले.
राज्यात जे काही सुरू आहे ते किळसवाणे, केली होती टीका
राज्यात सध्या जे काही सुरू आहे ते किळसवाणे आहे. घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं काहीच समजत नाही. मात्र हे काही अचानक घडलेले नाही तर फार आधीपासून ठरत होतं. अशा गोष्टी अचानक होत नाहीत. हे सगळे फार आधीपासून प्लॅन केलेले असणार. प्रफुल्ल पाटील किंवा दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्याकडे जाणाऱ्यांतले नाहीत. शरद पवार यांच्याबरोबरची ही माणसे अचानक उठतील व अजित पवारांना साथ देतील असे होणार नाही. त्यामुळे या सर्व घडामोडींमध्ये शंकेला जागा आहेत. जे झाले त्यात शरद पवार यांचा हात असण्याची शक्यताही राज यांनी व्यक्त केली होती.