पुणे : पावसाळ्यात साथीच्या आजारांचा फैलावाची शक्यता असल्याने पालिकेकडून प्रतिबंधात्मक फवारणी आणि जनजागृतीवर भर दिला जात आहे. जानेवारीपासून शहरात डेंग्यूचे एक हजार संशयित आढळून आले आहेत. यात ३६ रुग्ण आढळून आले असून चिकुनगुनियाचे ४० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारी बाळगली जात आहे.
पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया आदी साथीच्या आजारांच्या प्रादुर्भावाची शक्यता असते. त्यामुळे डासोत्पत्तीची ठिकाणे, कचरा, घाणीची ठिकाणे शोधून तेथे औषधांची फवारणी केली जाते. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सोसायट्यांना भेट देऊन माहिती देणे, भित्ती पत्रके लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. इमारतींच्या टेरेस, बाल्कनीमध्ये तसेच आवारात पाणी साठण्याची ठिकाणी शोधून तेथे पाणी राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
खासगी लॅब आणि रुग्णालयांकडून या आजारांची माहिती घेतली जात आहे. या आजारांच्या रुग्णांचे रिपोर्ट घेऊन त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करुन घराची आणि परीसराची पाहणी केली जात असल्याचे पालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.