पुणे : महापालिकेच्या मिळकत कर विभागाने आठ महिन्यात सुमारे १ हजार ३ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ११५ कोटी पेक्षा अधिक मिळकत कर आतापर्यंत अधिक जमा झाला आहे. परंतु यंदा प्रशासनाने मिळकत कर विभागाला तब्बल २१०० कोटी रुपयांचे उद्दीष्ट दिले आहे. यामुळे पुढील चार महिन्यात तब्बल ११०० कोटी रुपयांचे उद्दीष्ट पूर्ण होणार का याबाबत मात्र शंकाच आहे. शहरामध्ये विविध विकास कामे करण्यासाठी व नव्याने प्रकल्प हाती घेण्यासाठी मिळकत कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. परंतु गेल्या काही वर्षांत मिळकत करामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुट निर्माण होत असून, याचा महापालिकेच्या अंदाजपत्रकावर चांगलाच परिणाम होत आहे. यासाठीच महापालिका आयुक्त व मिळकत कर विभागाने यंदा पहिल्या महिन्यांपासूनच मिळकत कर वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केला आहे. यामध्ये थकबाकी वसुलीसाठी अधिक भर देण्यात आल्याने यंदा पहिल्या आठ महिन्यांमध्ये सुमारे १ हजार ३ कोटी रुपयांचा मिळकत कर वसूल करण्यात आला आहे. याबाबत सह महापालिका आयुक्त विलास कानडे यांनी सांगितले की, यंदा सुरुवाती पासूनच मिळकत कर वसूलीवर अधिक लक्ष देण्यात आले आहे. यात थकबाकी वसुलीसाठी अधिकचे सेवकांची मदत घेण्यात आली असून, १ नोव्हेंबर पासून बॅन्ड पथकाची मदत घेण्यात आली आहे. मिळकत कर विभागाने यंदा सुरुवातीपासूनच नियमित मिळकत कर भरणा-या नागरिकांपेक्षा थकबाकीदारांवर अधिक लक्ष केंद्रीत केले. यामुळे १ एप्रिल ते २८ नोव्हेंबर अखेर पर्यंत शहरामध्ये तब्बल ६ लाख ८१ हजार ६०० मिळकत करदात्यांनी १ हजार ३ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे. अद्यापही २ लाख ९७ हजार १०० मिळकत कर धारकांकडून तब्बल ११०० कोटी रुपये वसूल होणार का याचे मोठे आवाहन प्रशासनाच्या समोर आहे. यामध्ये मोठ्या रक्कमांच्या थकबाकीदारांची संख्या अधिक आहे. यामुळेच आता पर्यंत तब्बल २३ हजार ६३५ मिळकत कर धारकांना नोटीसा देण्यात आल्या असून, सुमारे ११५ मिळकती सील करण्यात आल्या असल्याचे कानडे यांनी स्पष्ट केले. पुढील चार महिन्यात जास्तीत जास्त मिळकत कर वसूल करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
शहरात आठ महिन्यात एक हजार कोटींचा मिळकत कर जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 8:22 PM
चार महिन्यात ११०० कोटीचे उद्दीष्ट पूर्ण होणार का ?
ठळक मुद्देयंदा सुमारे ११५ कोटी पेक्षा अधिक मिळकत कर आतापर्यंत अधिक जमा