लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : पारनेर पोलिसांनी वाळूच्या पकडलेल्या गाड्या सोडवल्या नाही म्हणून एकाला रिव्हाॅल्वर पोटाला लावून तलाठी कार्यालयासमोर एकावर तलवार व लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शिरूर येथे गुरूवारी (दि.१६) घडली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश शिवराम पाचर्णे (रा. गुजरमळा, श्री रेसिडेन्सी, शिरूर) हे या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार
अविनाश घावटे, गणेश घावटे, कोळपे पूर्ण नाव माहीत नाही व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश शिवराम पाचर्णे यांना आरोपींनी फोन करून तलाठी कार्यालयात बोलावून घेतले. आरोपींनी पारनेर पोलिसांनी (जि. अहमदनगर) पोलिसांनी पकडलेल्या वाळूच्या गाड्या सोडविण्यासाठी मदत केली नाही याचा राग मनात धरून अविनाश घावटे याने पाचर्णे यांच्या पोटास रिव्हॉल्वर लावली. तर गणेश घावटे याने तलवारीने पाचर्णे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कोळपे व इतर दोन इसमांनी मिळून लाकडी दांडक्याने पाचर्णे यांना मारहाण करून जखमी केले. गोकूळ काळुराम शेवाळे (रा. रामलिंग ता. शिरूर) यास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील बाकी आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.