खोडद : कोरोना महामारीच्या संकटात फ्रंटलाइनवर सेवा देणाऱ्या आरोग्य सेवकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत ५० लाख रुपयांचा लाभ देणाऱ्या विमा संरक्षण योजनेची मुदत वाढविण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील परिपत्रक केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केले आहे, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
कोविड संकट सुरू झाल्यापासून ही विमा संरक्षण योजना राबविली जात होती. परंतु, २४ मार्च २०२१ रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिपत्रक काढून ही योजना रद्द केली होती. ही विमा योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणी पत्राद्वारे आपण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडे केली होती. त्यावर केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेत या विमा संरक्षण योजनेला एक वर्षाची मुदतवाढ दिल्या बद्दल केंद्र सरकार व आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आभार मानले .
याबाबत माहिती देताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, गतवर्षी कोविड १९ विषाणूच्या संसर्गामुळे कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित केले. दरम्यान देशभरात फ्रंटलाइनवर आरोग्यसेवा देताना ज्या आरोग्य सेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत ५० लाख रुपयांची विमा संरक्षण योजना राबविली जात होती. मात्र मुदत संपल्याचे कारण देत ही विमा संरक्षण योजनाच बंद करत असल्याचे राज्य सरकारांना कळविले होते. गतवर्षी पेक्षा चालू वर्षात कोरोनाचे संकट अधिक भयंकर रुप धारण करत आहे. अशा भीषण परिस्थितीमध्ये लाखो डॉक्टर, परिचारिकांसह अन्य आरोग्य सेवक जीव धोक्यात घालून अहोरात्र झटत आहेत .जोपर्यंत कोरोना महामारीचा देशातून पूर्णपणे नायनाट होत नाही, तोपर्यंत सर्व आरोग्य सेवकांसाठीची विमा संरक्षण योजना सुरू ठेवावी, अशी आग्रही मागणी १९ एप्रिल २०२१ रोजी केली होती. या मागणीचा गांभिर्याने विचार करत केंद्र सरकारने विमा संरक्षण योजनेला एक वर्षाची मुदतवाढ दिल्याची अधिकृत घोषणा केली.
---