पुणे : पुण्यातील भिडे पुलावरुन उडी मारुन पुराच्या पाहण्यात पाेहण्याची पैज एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. मुठा नदीपात्रात उडी मारलेल्या दाेघा तरुणांपैकी एक तरुण वाहून गेल्याची घटना आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास घडली. प्रकाशसिंह श्रीभवन बाेहरा( वय 20 वर्षे) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून पाेलिसांनी शर्यत लावलेल्या असिभ अशाेक उफील (वय 18 वर्षे) याला ताब्यात घेतले आहे. दाेघे तरुण हे नारायण पेठ येथील दावत ए कबाब या हाॅटेलमध्ये कामाला हाेते.
पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रात चांगला पाऊस हाेत असल्याने पुण्यातील सर्वच धरणे शंभर टक्के भरली आहेत. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मुठा नदी पात्र साेडून वाहत आहे. त्यातच आज दुपारच्या सुमारास भिडे पुलाला नदीचे पाणी लागले हाेते. मागे आलेल्या पुरात पुलाचे कठडे वाहून गेले हाेते. त्यामुळे सध्या पुलाला कुठलेही संरक्षक कठडे नाहीत. संध्याकाळच्या सुमारास काही तरुणांची पुराच्या पाण्यात पाेहण्याची पैज लागली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाेघांनी पुलावरुन नदीत उडी घेतली. पाण्याच्या प्रवाहामुळे एक तरुण वाहून गेला आहे. तर दुसरा तरुण पाेहत किनाऱ्याला आला. पाेलिसांनी याची माहिती मिळताच पाेलिसांनी किनाऱ्यावर आलेल्या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याकडे चाैकशी करण्यात येत आहे.
दरम्यान भिडे पुलाला पाणी टेकले असताना तरुण तरुणी पुलावर गाडी थांबवुन धाेकादायकरित्या सेल्फि काढत हाेते. अनेकजण पुलावरुन पाण्यात पाय साेडत हाेते. काही वेळाने पाणी पुलावर येण्यास सुरुवात झाल्यानंतर पाेलिसांनी पूल वाहतुकीसाठी बंद केला. तसेच पुलावरुन जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला.