बारामती : खासगी सावकारकीच्या विळख्यात सर्वसामान्य बारामतीकर भरडून निघत आहे. ५ लाखांच्या रकमेपोटी १३ लाख रुपये व्याज देऊनसुद्धा सावकाराने आणखी ३ लाख रुपयांची मागणी केल्याने या जाचाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत संबंधित सावकाराच्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. ४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती शहरातील म्हसोबानगर येथील रहिवासी उमेश हनुमंत भोसले सध्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहेत. यासंदर्भात राहुल रामचंद्र देवकाते (रा. नीरावागज, ता. बारामती) या खासगी सावकाराच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : भोसले यांनी दवाखान्यासाठीव घरखर्चासाठी वेळोवेळी राहुल देवकाते याच्याकडून डिसेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ पर्यंत ५ लाख रुपये १५ टक्के व्याजाने घेतले होते. या रकमेपोटी भोसले यांनी पत्नी किशोरी भोसले यांच्या बँक खात्यामधून फेब्रुवारी २०१८ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत चेक व रोख रकमेद्वारे १८ लाख रुपये देवकाते याला दिले. मात्र आणखी व्याजापोटी ३ लाख रुपये द्यावेत, म्हणून राहुल देवकाते, उमेश भोसले यांना वारंवार फोन करून त्रास, तसेच धमकी देत होता. गुरुवारी (दि. ३) उमेश भोसले यांना देवकाते याने फोन करून शहरातील शिवाजी चौकात बोलावले. यावेळी देवकाते याने ‘माझे ३ लाख रुपये दे अन्यथा मी तुला मारून टाकीन नाहीतर तू स्वत: मर,’ अशी धमकी दिली. यावेळी भोसले यांनी देवकाते याच्या त्रासाला कंटाळून शिवाजी चौकातच देवकाते याच्यासमोर विष प्राशन केले. घाबरलेल्या देवकाते याने काही लोकांच्या मदतीने भोसले यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व तो तेथून निघून गेला.
नातेवाईकांच्या मदतीने भोसले यांच्या पत्नी किशोरी भोसले यांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी अतिदक्षता विभागात उमेश भोसले यांच्यावर उपचार सुरू होते. घटनेची माहिती देताना भोसले यांनी पत्नी किशोरी यांना देवकाते याने ‘मला ३ लाख रुपये व्याजाचे दे, नाहीतर तुला खल्लास करीन,’ अशी धमकी दिली. त्याच्या त्रासाला कंटाळून मी विष प्राशन केले,’ असे सांगितले. गुन्ह्यातील आरोपी राहुल देवकाते फरारी आहे.राहुल देवकाते यानेच भोसले यांना रुग्णालयात दाखल केले. पोलीस कारवाईच्या भीतीने तो फरारी झाला आहे. आम्ही लवकरच त्याचा शोध घेऊ. तसेच खासगी सावकारकीच्यासंदर्भातील आतापर्यंत सात गुन्हे दाखल झाले आहेत. नागरिकांनी खासगी सावकारांना न घाबरता समोर यावे व पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल कराव्यात.- अशोक धुमाळ, पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस ठाणे