लासुर्णे : इंदापूर बारामती राज्य महामार्गापासून बेलवाडी पालखी महामार्ग ते पवारमळा महादेव मंदिर रस्त्यादरम्यान नुकतेच भर पावसात सुरू असलेले काम बंद पाडले. संतप्त नागरिकांनी रस्त्याचे चालू असलेल्या कामाविरोधात लेखी तक्रार केली आहे.
दरम्यान, जिल्हापरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराची चौकशी करावी अन्यथा रास्ता रोको करू, असा इशारा सागर पवार, नितीन सोनवणे, आबासाहेब पवार यांनी दिला आहे.
बेलवाडी पालखी महामार्ग ते पावरमळापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदार स्वत:च्या सवडीनुसार दुरुस्तीचे काम करत आहे. संबंधित ठेकेदाराने मागील दोन महिन्यांपूर्वी ओढ्यावरील पुलाचे काम वारंवार विनंती करूनसुद्धा निविदेप्रमाणे न करता अपूर्ण सोडून दुसऱ्या ठिकाणी काम सुरू केले होते. मात्र, केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने पूर्णपणे उचकटले गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर पंचक्रोशीतील पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराचे आज नवीन ठिकाणी सुरू केलेले काम बंद पाडून काम दर्जेदार करण्याची मागणी केली. मात्र, ठेकेदाराने तात्पुरते काम थांबवून पुन्हा निकृष्ट दर्जाचे काम सुरू केले.
गेल्या तीन महिन्यांपासून पवार मळा रस्त्यावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र या मार्गावरून आज जरी अवजड वाहनांची वाहतूक सुरू असली, तरी संबंधित ठेकेदाराने गेले दोन महिने गप्प बसून आता काम पूर्ण करण्याचा घाट घातला आहे. मार्चअखेरीस अर्धवट काम संपवून बिल काढण्यासाठी संबंधित ठेकेदार पदाधिकारी व सामान्यांच्या भावनांचा विरोध झुगारत मनमानी करत असून, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग ठेकेदाराला पाठीशी घालून हात मिळवणी करत आहे, की काय असा प्रश्न पदाधिकारी व सामान्य जनतेला पडला आहे.
बेलवाडी येथे भर पावसात सुरू असलेले रस्त्याचे डांबरीकरण.
२००८२०२१-बारामती-०२