पुणे : केंद्र सरकारने कांद्यावर भरमसाट निर्यात शुल्क लादल्यानंतर शेतकऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. मात्र, आता या निर्यात शुल्काचा फटका गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील घाऊक बाजाराला बसला आहे. मागील आठवड्यात कांद्याचा बाजार सुरळीत चालू असताना अचानक कांदा निर्यात शुल्क ४० टक्के करण्याचा निर्णय केंद्राने घेतला.
एकीकडे कांद्याच्या भावात वाढ होत असल्याने साठवणूक केलेला कांदा शेतकऱ्यांनी बाजारात आणला. त्यातच कांद्यावर निर्यात शुल्क वाढवल्याने निर्यात शुल्कवाढीमुळे कांद्याच्या आवकेवर मार्केट यार्डातही परिणाम झाला आहे.
गुलटेकडी मार्केट यार्डातील कांदा बाजारात सोमवारी सुमारे ७०० टन कांद्याची आवक झाली होती. मागील आठवड्यात कांद्याची आवक सरासरी ८०० ते ९०० टन होत होती. या निर्णयामुळे कांद्याच्या आवकेत परिणाम झाल्याने पुन्हा कांद्याच्या भावात परिणाम झाला आहे.
कांदा निर्यातीवरील शुल्क रद्द करा
ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली कांदा निर्यातीवर लावलेला कर रद्द करावा, या मागणीसाठी शेतकरी व कष्टकरी यांच्या वतीने केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्या कार्यालयाबाहेर अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीच्या वतीने (दि. २३) सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दर्जानुसार २० ते २२ रुपये प्रतिकिलोला भाव मिळत आहे. मागील आठवड्यात कांद्याला २८ ते ३० रुपये प्रतिकिलो भाव मिळत होता. सध्या किरकोळ बाजारात कांदा दर्जानुसार प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांनी विकला जात आहे.
- राजेंद्र कोरपे कांदा व्यापारी, मार्केट यार्ड
निर्यात शुल्काचा फटका गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील घाऊक बाजाराला बसत आहे. मागील आठवड्यात कांद्याचा बाजार सुरळीत चालू होता. मात्र, या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना याचा फटका बसत आहे. परिणामी, कांदा आवक घटली आहे.
-विलास भुजबळ, ज्येष्ठ आडते व्यापारी