घोडेगाव : कांद्याला भाव वाढेल या आशेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांनी बराकीत कांदा खराब होऊ लागल्याने जनावरांना खाऊ घालायला सुरुवात केली आहे. बाजारात विकायला पाठवून गाडी व पिशवीचा खर्चही सुटत नसल्याने काही शेतकरी धनगरांना मेंढरांना खाण्यासाठी कांदा देऊ लागले आहेत. काद्यांला चांगला भाव नसूनही या वर्षी नवीन लागवड जोमात सुरू आहे.
मागील वर्षी आंबेगाव तालुक्यात सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकºयांनी कांद्याचे उत्पादन घेतले. भाव मिळेल या आशेने बराकीत कांदा साठवून ठेवला. शेतकºयांनी यासाठी नवीन बराक बांधल्या. मात्र शेवटपर्यंत कांद्याचा भाव वाढला नाही. काही दिवस २५० ते ३०० रुपयांपर्यंत भाव गेला. मात्र त्यावेळी अजूनही भाव वाढेल या आशेने शेतकºयांनी कांदा घातला नाही. त्यानंतर जो भाव पडला तो अजूनही वाढला नाही. त्यात पावसाळ्यात लागवड झालेला कांदा बाजारात आला. त्यालाही शंभर रुपयांच्या आत बाजारभाव. त्यामुळे जुन्या कांद्याला कोणी विचारेना.
काही बाजारपेठांमध्ये जुना कांदा विक्रीसाठी अणू नये असे जाहीर सांगण्यात आले. काही तरी चमत्कार होईल व बाजारभाव वाढेल, या आशेने शेतकरी वाट पाहत होते. मात्र, भाव वाढले नाहीत. बराकींमध्ये साठवून ठेवलेला कांदा सडू लागला, त्याला मोड फुटले, बराकी वास मारू लागल्या. शेवटी वैतागलेल्या शेतकºयांनी कांदा जनावरांना खाऊ घालायला सुरुवात केली. धनगर लोक मातीमोल भावाने मेंढरांना खाद्य म्हणून कांदा घेऊन जात आहेत.