लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने सध्या राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक तब्बल ५०-६० टक्क्यांनी घटली आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात दररोज १७०-२२० ट्रक कांद्याची आवक होत असते. परंतु, सध्या मार्केट यार्डात केवळ ७०-८० ट्रक कांद्याची दररोज आवक होत आहे. त्यात हळवी कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसांत कांद्याच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
यंदा ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी आवकाळी पावसाने हाहाकार माजवला. याचा सर्वात मोठा कांदा उत्पादक शेतक-यांना बसला. त्याचे परिणाम आता मार्केटमध्ये दिसत असल्याचे रितेश पोमण यांनी सांगितले. सध्या हळवी कांद्यााचा (लाल कांदा) हंगाम अंतिम टप्प्यात आल्यामुळे या कांद्यााची आवक कमी झाली आहे. परिणामी बाजारात कांद्यााचा तुटवडा निर्माण झाला आहे. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कांदा दरात तेजी सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्यााची विक्री ५० ते ६० रुपये दराने केली जात आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत असून कांद्याचे दर आणखी वाढू शकतात.
हळवी कांद्याचा हंगाम फेब्रुवारी अखेर पर्यंत संपतो व याच दरम्यान गरवी (उन्हाळी कांदा) कांद्यााचा हंगाम सुरू होतो. सध्या गरवी कांद्याची आवक अल्प प्रमाणात सुरू असल्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून बाजारात कांद्यााचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कांदा दरात वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत बाजारात होणारी गरवी कांद्यााची आवक कमी आहे.
सध्या घाऊक बाजारात दहा किलो कांद्यााला ३०० ते ३४० रुपये असा दर मिळाला आहे. गेल्या वर्षी गरवी कांद्यााचे उत्पादन उच्चांकी झाले होते. यंदाच्या वर्षी झालेल्या अवेळी पावसामुळे कांद्यााचे मोठे नुकसान झाले. कांदा बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्याने लागवडीवर मोठा परिणाम झाला. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारात दररोज १७० ते २२० ट्रक कांदा विक्रीस पाठविला जात होता. .पुणे, नाशिक, वाशी या महत्त्वाच्या बाजार आवारात पुणे जिल्हा, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तसेच नाशिक परिसरातून हळवी कांद्यााची आवक होत आहे.
--
आवकाळी पावसामुळे यंदा कांद्याचे रोपही मिळेना
यंदा संपूर्ण वर्षे लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यात ऑक्टोबर, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या आवकाळी पावसामुळे दिवाळीत काढणीला आलेले कांदा पिक वाय गेले, तर उन्हाळी कांद्याच्या रोपाला ही फटका बसला. यामुळे यंदा हजारो शेतकऱ्यांना कांद्याचे रोप देखील मिळण्यासाठी अनेक अडचणी आल्या. आवकाळी पावसामुळे कांदा लागवडीचा हंगाम लांबणीवर पडला आहे. यामुळेच सध्या बाजारात कांद्याची आवक कमी असून, दर वाढत आहेत.
- नवनाथ शेळके, कांदा उत्पादक शेतकरी जुन्नर