पुणे : ओखी वादळामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा परिणाम कांदा पुन्हा तेजीत आला असून, आवक कमी झाल्याने दर काही प्रमाणात वाढले आहेत.सध्या नवीन कांद्याचा हंगाम सुरु झाला आहे. यंदा दरवर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात हंगाम सुरु होण्यास उशीर झाला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस अथवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गरवी कांद्याची आवक सुरु होईल़ हे पीक मात्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल़ तो पर्यंत बाजार तेजीतच राहतील असा अंदाज श्री छत्रपती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे़ दरम्यान जुन्या कांद्याचा हंगाम संपला आहे. मार्केट यार्डात दाखल होणारा कांदा हा पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातून येत आहे़ रविवारी जुन्या कांद्याची अवघी ३ ते ४ ट्रक तर नवीन कांद्याची २०० ट्रक इतकी आवक झाली आहे़ घाऊक बाजारात नवीन कांद्यास २५० ते ३३० रुपये तर जुन्या कांद्यास ३५० ते ४५० रुपये प्रति दहा किलोस दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात कांद्याची तब्बल ४० ते ५० रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे. कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे.
कांदा पुन्हा तेजीत; ओखी वादळामुळे नुकसान झाल्याने आवक घटून दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 3:53 PM
ओखी वादळामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा परिणाम कांदा पुन्हा तेजीत आला असून, आवक कमी झाल्याने दर काही प्रमाणात वाढले आहेत.
ठळक मुद्देकिरकोळ बाजारात कांद्याची तब्बल ४० ते ५० रुपये प्रतिकिलोने विक्री कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण